ढेकळफेकी

 गेली काही दिवस खुप धावपळीत गेली. महिन्याभरापूर्वी पुण्याला मित्राचे लग्न होते. तिकडे गेल्यामुळे आर्थिक गणिते बिघडली. दुकान बंद केल्यामुळे अनेक ग्राहक तुटले. तसेही सिमकार्ड विक्री हा धंदा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो काही भाजीपाला नाही जो दरारोज अनिवार्य आहे. 
प्रत्येक धांद्यामध्ये आज कॉम्पिटिशन वाढलेली दिसेल. शहरात एकही छत्री लागत नव्हती तेव्हापासून चौकात बसून हा धंदा वाढवला. ऊन वारा पाऊस हे न पाहता रस्त्यावर बसून काम करायचो; तेव्हा येणारे जाणारे ओळखी अनोळखीचे लोकं आश्चर्याने बघायची. असाही एखादा धंदा असतो यावर त्यांचा विश्वास बसायचा नाही. रिकामी फिरस्ती पोरं माझ्याजवळ यायची आणि कामाविषयी साविस्तर विचारायची; तेव्हा क्षणाचाही विलंब न करता मी सर्व काही सविस्तर सांगायचो. आणि तुम्ही पण हा व्यवसाय सुरू करा, असा फुकटचा सल्ला द्यायचो. आज तीच पोरं माझ्या नाकावर टिच्चून महीना ३० ते ३५ हजार रु कमावताना दिसतात. असो,
परंतु आपल्यामुळे बऱ्याच लोकांचे परिवार जागेवर आले. त्यांची रोजीरोटी सुरळीत झाली याच काहीस समाधानही आहे.
एक गोष्ट तितकीच खरी आहे की जेंव्हा एखाद्याचा वाईट काळ सुरू असतो तेव्हा फुकट सल्ले देणाऱ्यांची टोळी सक्रिय होते. समुंद्रला ओहोटी आल्यानंतर तो उघडा पडतो. त्याची दगड गोटे वाळू उघड्यावर येते. बरेचजन त्याला नावे ठेवणारेही असतात. काय होतास तू काय झालास तू.
परंतु तो अथांग सागर आहे. भरती ओहोटी हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 
मानवी जीवन अगदी तसेच आहे. सुख-दुःख गरीब-श्रीमंती चढ-उतार यश-अपयश हे चालूच राहते. परंतु यातून मार्ग काढून पुढे चालत राहिले पाहिजे. निरंतर प्रमाणिकपणे चालत राहणे हेच जीवन आहे. 
पण जीवन जगात असताना आपल्यावर ढेकळफेकी ही होणारच.
ढेकळ हा तसा ठिसूळ पदार्थ असून तो फेकून मारल्यास फारशी ईजा करत नाही; परंतू मारणाराला असे वाटते की एका ढेकळात आपण समोरच्याला खल्लास करणार; आणि मार खणाराला असं वाटतं; कि एका ढेकळात आपला खेळ खल्लास..! परंतु तसे काही होत नसते. ढेकळफेकी हा शरीरावर केलेला आघात नसून मनावर केलेला आघात होय.
आयुष्यात मनावर असे कित्येक आघात होत राहतील. खंबीर राहायचं. नव्या जोमानं प्रत्येक संकटाला सामोरे जायचं. 
वाईट काळ हा एक दिवस सरून जातो.

Comments

Popular posts from this blog

मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी

केज शहर अपघातमुक्त होणार का?

मस्साजोग येथील क्रूर हत्याकांडाच्या निषेधार्थ बीड जिल्हा कडकडीत बंद ...