मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी
मद्यधुंद कंटेनर ड्रायव्हरचा केज शहरात धुमाकुळ! चिरडून महिला जागीच ठार. अनेकजण जखमी
आज दुपारी मातेफिरू कंटेनर ड्रायव्हरने मद्यधुंद अवस्थेत फिल्मी स्टाईलने केज शहरासह डोणगाव टोल नाका ते लोखंडी सावरगाव दरम्यान अनेकांना चिरडले. गाडी नंबर डीडी ०१ झेड ९७७१ असा असून यामध्ये १९ ते २० लोक गंभीर जखमी झाले आहेत. एक महिला जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. ठार झालेली महिला मीना प्रवीण घोडके या टाकळी गावच्या रहिवासी असल्याचे समजते.
याच कंटेनरने धडक देत श्रद्धा चिंचकर (येवता) यांना दहा ते पंधरा फूट सिमेंट रोड वरती घासत नेले.
या तरुणीस अंबाजोगाई येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले.
याच प्रमाणे बळीराम पांचाळ धाकेफळ, आशालता मुंडे चारधारी, सिद्धेश्वर शिंदे पिंपरी, शेषेराव चंदनशिव शिरपूर, फुलाबाई सावंत सुगाव, बेबी देशमुख बोरिसावरगाव, श्रीकृष्ण कापरे कापरेवाडी, कुमार गायकवाड देवगाव तसेच युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित कॉन्स्टेबल शिंदे आदी अपघातात गंभीर जखमी झाले असून अंबाजोगाई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सविस्तर माहिती अशी आहे की
डोणगाव टोल नाक्यावर कामगार काम करत असताना त्यांच्या समोरून एक ऑल इंडिया परमिट कंटेनर टोल नाक्याच्या कॅबिनला धक्का मारून पुढे निघून गेला.
अंबाजोगाई कडे जाणाऱ्या या कंटेनरच्या मागे लोक पाठलाग करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मद्यधुंद अवस्थेत झिंगलेला ड्रायव्हर थांबायला तयार नव्हता. कंटेनरकडे सर्वांचे लक्ष होते, काहीजण या कंटेनरचा पाठलाग करून ड्रायव्हरला कंटेनर थांबवण्याचा इशारा करत होते, परंतु तो कोणाचे ऐकायला तयार नव्हता. गाडीचा वेग कमी करायला तयार नव्हता. टाकळी फाट्यावरती एका टू व्हीलर ला सौम्य धडक देऊन तो पुढे केजच्या दिशेने निघाला. केज शहरातील शिक्षक कॉलनी जवळील काही गाड्यांना घासत तो पुढे शहरात घुसला.
आज केज शहरात शुक्रवारचा आठवडी बाजार असल्याकारणाने येथे चांगलीच गर्दी झालेली होती. रस्त्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी टू व्हीलर आणि इतर वाहनांची गर्दी होती. हा कंटेनर वाहनांना आणि गर्दीला चिरडत शहरातील जुन्या पोलीस स्टेशन समोर गेला. तेथे मीना प्रवीण घोडके यांना उडवले असता त्या जागेवर ठार झाल्या. येथेच श्रद्धा चिंचकर या तरुणीस धडक दिली असता ती १५ ते २० फूट सिमेंट रोड वरती घसरत गेली. तातडीने तिला आंबाजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
एवढे होऊन देखील हा कंटेनर थांबायला तयार नव्हता. तो पुढे मंगळवार पेठेमध्ये बाजार असलेल्या ठिकाणी काही टू व्हीलर ला घासून पुढे जय भवानी चौकात निघून गेला. जय भवानी चौकात एका पुरुषाला गंभीर धक्का देऊन पुढे अंबाजोगाईच्या दिशेने निघून गेला.
या घटनेने केज शहरात सगळीकडे गोंधळ उडाला. बराचसा जमाव आपल्या गाड्या घेऊन या कंटेनरच्या मागे पाठलाग करत निघाला. या घटनेचा मागोवा पोलिसांनाही लागला होता. पोलिसांनी संबंधित कंटेनर चा फोटो अंबाजोगाई पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करत त्याला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्या पद्धतीने अंबाजोगाई पोलीस स्टेशन सावध झाले.
इकडून कंटेनर अंबाजोगाईच्या दिशेने भरधाव जात असताना त्याने आणखीन काही लोकांना रस्त्यात चिरडले. लोखंडी सावरगाव येथील काही तरुणांनी या मातेफिरू ड्रायव्हरला थांबवण्यासाठी आपला ट्रॅक्टर आडवा लावला, परंतु यालाही न जुमानता त्याने दुसऱ्या बाजूने आपला कंटेनर पुढे सरसावला. पुढे त्याचे संतुलन बिघडल्यामुळे लोखंडी सावरगाव जवळ त्याचा अपघात होऊन रस्त्याच्या कडेला कंटेनर पलटी झाला. पाठलाग करणाऱ्या काही वाटसरूंनी ड्रायव्हरला कंटेनरच्या बाहेर काढत बेदम मारले. ऐनवेळी अंबाजोगाई पोलीस पुढे सरसावले व त्यांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले. तिथून पोलीस निघून गेल्यानंतर संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली.
हा थरार एवढा भयानक होता की ज्यांनी तो आपल्या डोळ्यांनी बघितला त्यांनी आपण थोडक्यात वाचलो असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेमध्ये अनेक जण गंभीर झाले असून यामध्ये एक जण महिला ठार झाल्यामुळे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment