केज शहर अपघातमुक्त होणार का?
केज शहर अपघातमुक्त होणार का?
काल दुपारी शहरात अपघाताची जी घटना घडली ती अतिशय संतापजना होती. मीना प्रवीण घोडके या महिला जागीच ठार झालेल्या असून १९ लोक यामध्ये जखमी झालेले आहेत.
या घटनेपासून काय धडा मिळाला याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. केज सिटी मध्ये राहणाऱ्या व आजुबाजूच्या खेड्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, की आपली वाहने रोडवरती उभी राहायला नकोत. शहरात अनेक ठिकाणी प्रशासकीय जागा रिकाम्या आहेत शक्यतो तेथे आपली गाडी पार्क करावी. सद्या जरी फूटपाथची व्यवस्था नसली तरी नवीन बनवलेल्या नाल्यावरून चालावे. नागरिकांनी मुख्य रोडवरून शक्यतो चालणे टाळावे.
ही झाली नागरिकांबाबतची सजगता. परंतु याठिकाणी अनेक छोटे व्यापारी मग ते फळगाडेवाले असतील रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकणारा असेल असे अनेक व्यापारी आहेत जे मुख्य रोडवर आपला व्यवसाय करतात, त्यांनी नालीच्या मागे बसून आपला व्यवसाय करावा. नालीवरून चालणाऱ्याना कुठलाही त्रास होणार नाही याची व्यापारी बांधुनी काळजी घ्यावी. हा प्रत्येकाच्या नैतिकतेचा भाग आहे. थोडीशी विवेक बुद्ध वापरून आपला व आपल्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येणार नाही याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करत रस्त्यावर येणाऱ्या ट्राफिकचे नीट व्यवस्थापक करायला हवे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. सजग नागरिक अशा संभाव्य घटनांबद्दल जेव्हा पोलिस प्रशासनाला कळवीत असतात, तेव्हा त्यांनी त्वरीत ॲक्शन घेणे गरजेचे असते. तत्काळ घेतलेल्या ॲक्शनमुळे पुढील संभाव्य घटना टळतात हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. प्रशासनाने कालच्या घटनेतील कंटेनर मागेच अडवला असता तर पुढील अनर्थ टळला असता. असो, या जर-तर च्या जरी गोष्टी वाटत असल्या तरी गांभीर्य मात्र सखोल आहे.
स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात जाग कधी येणार? आमच्या लोक प्रतिनिधींना अजून असे किती अपघात बघायचे आहेत. आपल्या घरातील व्यक्ती गमावल्यानंतरच आपल्याला जाग येणार आहे का? वर्षभरात कित्येक जण अपघातात मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशी अवजड वाहने जेव्हा शहरातून वाहतूक करतात तेंव्हा जीव मुठीत धरून येथील नागरिक, शाळकरी मुले, महिला, वावरतात. वाहतुकीला पर्यायी व्यवस्था आपण कधी देणार आहोत. यासाठी लोकप्रतिनिधी केव्हा पाठपुरावा करणार आहेत.
रोड अथॉरिटीने तत्काळ शहरांतर्गत ठीक ठिकाणी गतिरोधक तयार करणे गरजेचे आहे. सुव्यवस्थित फुटपाथ तयार होणे अत्यावश्यक आहे. शहरामध्ये ब्यारिगेट लावणे आवश्यक आहे.
यापूर्वी अनेक संघटनांनी व काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केजला बायपास रोड व्हावा यासाठी निवेदने दिलेली आहेत. सर्वमान्य नागरिकांमधूनही तोच सूर निघताना दिसत आहे. शहरासाठी रिंगरोड, बायपास रोड, किंवा उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे आहे. आत्ता येथील लोकप्रतिनिधी यामध्ये किती पुढाकार घेतात. कालच्या घटनेकडे पाहून कितीजण आपली ही मागणी लावून धरतात हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment